भाजप नेत्यांनी काम न केल्यानेच आपला पराभव झाल्याचे जाहीररीत्या सांगणार्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी आता भाजप शत्रू नंबर एक झाला आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यात एकमेकांचे तोंड न पाहणारे खैरे -दानवे ही जोडी भाजप विरोधी आंदोलनाच्या निमित्त एकत्र आल्याचे चित्र काल दिसून आले. जिल्हाप्रमुख या नात्याने आ. दानवे यांनी अतिशय घाईघाईत केलेल्या आंदोलनाला खैरेंची उपस्थिती लक्षणीय ठरली.
गेली काही दशके शिवसेनेचा गाडा एक हाती हाकणार्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पक्षांतर्गत शह देण्याचे काम गेल्या काही वर्षात झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या वादळानंतर एकवटलेल्या नेत्यांनी आ. अंबादास दानवे यांना पुढे केले अन सेनेतील परिस्थिती बदलली. हळूहळू या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. शिव जयंतीच्या तसेच सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दोघांमधील वाद उफाळून आला. त्यानंतर खैरे यांनी थेट आमदार दानवे पक्षविरोधी कारवाया करत असल्याची तोफ डागली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या दौर्यातही या दोघांमधील राजकीय अंतर प्रकर्षाने समोर आले. सेनेतील शीर्षस्थ नेत्यांमधील हा वाद पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मात्र अस्वस्थ करून गेला.
...म्हणूनच दानवे यांच्या हाकेला ओ!
व्यंकय्या नायडू निषेध प्रकरणात जिल्हाप्रमुख आमदार दानवे यांनी दुपारी घाईघाईत आंदोलनाचे नियोजन केले. अवघ्या तासाभरात सर्व नेतेमंडळींना निरोप देण्यात आले. कोरोना संकटाच्या काळातील सेनेचे हे सर्वात मोठे आंदोलन ठरावे, याची रणनीती आखण्यात आली. आ. दानवे यांनी खैरेंनाही निरोप धाडला. भाजप विरोधातील आंदोलन असल्याने खैरे तातडीने आंदोलन स्थळी दाखल झाले. एकंदरीत भाजप विरोधानेच दोन्ही नेत्यांचे मनोमिलन घडविले तर नाही ना ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
भाजप शत्रू नंबर एक!
राजकीय कारकिर्दीत एकही पराभव न पाहिलेल्या खैरेंना गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभव अस्वस्थ करून गेला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यामुळेच आपल्याला पराभव पत्करावा लागल्याचे शल्य खैरेंना कायम बोचत असते. त्याचबरोबर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी निवडणुकीत काम केले नसल्याचा थेट आरोपही त्यांनी केला होता. आपल्या पराभवाला भाजपच जबाबदार असल्याची पक्की खात्री खैरेंना झाली. अशा परिस्थितीत सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एमआयएम पेक्षा त्यांच्यासाठी भाजपच शत्रू नंबर एक ठरतो आहे.










